संत बाळूमामांच्या भंडाऱ्याचा रथोत्सव सोहळा उत्साहात, मेंढ्यांच्या दुधाने भरलेल्या घागरी रथातून आदमापुरात

बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादाकरिता 18 बग्गींतील मेंढय़ांच्या दुधाच्या घागरी बाळूमामांच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम कागल तालुक्यातील निढोरी येथे धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. या वर्षी बाळूमामांच्या रथास ओढण्याचा मान पुण्यातील रावेतच्या नंदकुमार शिवळे (वाल्हेकरवाडी), दत्तात्रय भोंडवे यांच्या बैलजोडीला मिळाला.

बाळूमामांच्या भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः मेंढय़ांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही कायम आहे. महाराष्ट्रासह लगतच्या विविध राज्यांत बाळूमामांनी जतन केलेल्या सुमारे 30 हजार बकऱयांचे 18 ठिकाणी कळप आहेत. बाळूमामांनी सुरू केलेल्या प्रथेनुसार भंडाऱयाच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी हे सर्व कळप निढोरीत एकत्र आणले जातात. या कळपांतील मेंढय़ांच्या दुधाने भरलेल्या घागरींचे भाविकांनी स्वागत केले. फुलांनी सजविलेल्या रथात विधीपूर्वक या दुधाच्या घागरी ठेवण्यात आल्या. येथूनच बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य कळपांमधील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडीतून रथासह आदमापूरकडे रवाना झाल्या. द्वादशीदिवशी सकाळी मानाच्या घागरींतून बाळूमामांना दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरींतील मेंढय़ांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे.

रथोत्सवाच्या दोन किलोमीटर मार्गावर भक्तांनी जेसीबीतून भंडाऱयाची उधळण केली. रस्त्यावर नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुलांची पखरण, कीर्तन-प्रवचनाबरोबर टाळ-मृदंगांचा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट, भंडाऱयाची मुक्त उधळण करीत ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं!’चा जल्लोष करण्यात आला.

जागर आणि भाकणूक; आज भंडारा यात्रेचा मुख्य दिवस

राजस्थान व मध्य प्रदेशातील धनगर बांधवांनी सुमारे 50 लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळूमामांची 138 किलो चांदीची मूर्ती बसविण्यात आली होती. रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाळूमामांच्या मेंढय़ांच्या 18 कळपांतून आलेल्या दुधाचे कलश याच रथातून बाळूमामांच्या समाधिस्थळावर आणण्यात आले. आदमापुरातील सुहासिनींनी ‘श्रीं’च्या रथाचे औक्षण केले. पहाटे कृष्णात डोणे यांची भाकणूक होणार असून, आजच लाखो भाविक आदमापूरमध्ये दाखल झाले आहेत.