काटेवाडीत रंगले मेंढ्यांचे गोल रिंगण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विठुरायाचा जयघोष अन् टाळ-मृदंगांच्या गजरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे धोतरांच्या पायघडय़ा घालून उत्साहात स्वागत करण्यात आले. तर, या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले. मेंढय़ांचे पहिले गोल रिंगण पाहण्यासाठी वारकरी व भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

काटेवाडीतील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतरांच्या पायघडय़ा घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत केले. याप्रसंगी पालखीभोवती वारकऱयांनी रिंगण केले आणि त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा सुरू झाला. सुरुवातीला पालखीभोवती मेंढय़ा धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशीवृंदावनसह कलश डोईवर घेतलेल्या महिला वारकरी, वीणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगणाच्या पाच फेऱया पूर्ण होईपर्यंत ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.