
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गाभाऱयातील दर्शन येत्या 1 जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. प्रोटोकॉल निश्चित केलेल्या अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्तींना आणि आरतीचे यजमान असणाऱया व्यक्तींना व पुजाऱयांना पारंपरिक सोवळ्यात गाभाऱयात दर्शन देण्यात येणार आहे.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आदी देवस्थानांत गाभाऱयातून दर्शन दिले जात नाही. सप्तशृंगी मंदिरात विशेष पासद्वारे गाभाऱयात दर्शन दिले जात होते, आता ते 1 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे. विश्वस्त आणि ग्रामसभेच्या ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायाधीश देशमुख यांनी सांगितले. भाविकांमध्ये समानता राहावी आणि मंदिराचे पावित्र्य राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरतीचा मान असलेले यजमान, पुजारी आणि नियमानुसार प्रोटोकॉल असलेल्या व्यक्तींना मात्र गाभाऱयात सोवळ्यात दर्शन घेता येणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वस्त रावसाहेब शिंदे, उन्मेष गायधनी, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी हजर होते.




























































