सारसबाग, टिळक रस्त्यावर महिलांची मंगळसूत्रे हिसकाविली, दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. दररोज महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र हिसकाविल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी पायी चाललेल्या आणि दुचाकीस्वार महिलांचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. अर्ध्या तासात दोन सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटनांमुळे हद्दीतील बीट मार्शल पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

टिळक रस्त्यावरून दुचाकीवर घरी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकाविल्यानंतर महिलेने आरडाओरड केली, पंरतु चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. बी. कुरेवाड तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत अर्ध्या तासाच्या फरकाने दुचाकीस्वार चोरट्यांनी सारसबागेजवळील सणस मैदानापासून रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन्ही घटना अर्ध्या ते पाउण तासात घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यवर्ती भागात महिलांचे मंगळसूत्र हिसकाविल्यामुळे चिंता व्यक्ती केली जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.