‘Sardaar Ji 3’ चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरमुळे वाद चिघळला, दिलजीत दोसांझवर घालण्यात येणार बंदी?

दिलजीत दोसांझच्या ‘सरदार जी 3’ वरुन आता वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य म्हणजे या वादाचं मुख्य कारण पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्यामुळे चांगलाच वादात अडकलेला आहे. त्याच्या आगामी ‘सरदार जी 3’ चित्रपटाचे प्रदर्शन वादात अडकले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिसणार आहे. त्यामुळेच सध्या त्याच्या विरोधात सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान वादानंतर हिंदुस्थानात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही हानिया आमिरला दिलजीतच्या चित्रपटामध्ये घेण्यात आले होते. यावरच आता चांगलाच वादंग निर्माण झालेला आहे. हानिया आमिरला चित्रपटात घेतल्यामुळे, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने दिलजीतच्या हिंदुस्थानातील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे असताना अभिनेता आणि गायक दिलजीतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातून दिलजीतने तो हानियाच्या मागे असल्याचे स्पष्ट केले आहे.

FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी दिलजीत दोसांझवर, हिंदुस्थानी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच दिलजीतच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. FWICE चे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी दिलजीत बद्दल एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सरदार जी 3 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या कास्टिंगचा FWICE कडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, FWICE ने सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे की ते सेन्सॉर केले जाऊ नये. कारण त्यात फक्त हानियाच नाही तर तीन-चार कलाकार आहेत. यामुळे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. इतकेच नाही तर बीएन तिवारी पुढे म्हणाले की, हा चित्रपट पाकिस्तानात किंवा परदेशात कुठेही प्रदर्शित झाला तर तो देशासाठी देशद्रोहापेक्षा कमी नाही.

‘सरदार जी 3’ हा चित्रपट 27 जूनला हिंदुस्थानबाहेर प्रदर्शित होणार आहे. परंतु हिंदुस्थानतील प्रदर्शनाबद्दल मात्र कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.