लस नसेल तर सरपंच, उपसरपंच अपात्र, संगमनेर पंचायत समितीचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास त्यांना अपात्र ठरविण्याचा तसेच लसीकरण न केलेल्या व्यक्तींचे रेशन व अन्य शासकीय सवलती बंद करण्याचा निर्णय संगमनेर पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

संगमनेर पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेसाठी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. या वेळी त्यांनी शंभर टक्के लसीकरण येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील शुक्रवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली, तर पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये कोरोना लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्यासाठी सक्तीचे आदेश पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तालुक्यातील पहिला व दुसरा डोस झालेला नसलेल्यांचे रेशन आणि अन्य शासकीय योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत