ससूनमध्ये कोरोना मृत्यू वाढल्याने अधिष्ठात्यांची तडकाफडकी बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथे आतापर्यंत कोरोनाबाधित 47 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 36 रुग्ण हे ससून रुग्णालयात दगावल्याने विभागीय आयुक्तांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली. या बदलीविरोधात रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱयांनी आज आयुक्तांची भेट घेऊन ही बदली रद्द करण्याची मागणी केली.

ससून रुग्णालयातील दोन वॉर्डांमध्ये कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. पुण्यात दगावलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे ससूनमध्ये दगावल्याने तेथील उपचार पध्दतीवर आक्षेप घेतले जात होते. त्याच कारणास्तव विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचे आदेश दिले असे सांगितले जाते.

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचे वृत्त कळताच आज सकाळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारीका आणि सफाई कर्मचारी मोठय़ा संख्येने एकत्र आले. डॉ. चंदनवाले हे चांगले काम करत असल्याने त्यांची बदली करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर डॉक्टर्स आणि ‘मार्ड’ संघटनेच्या एक शिष्टमंडळाने यासंदर्भात डॉ. म्हैसेकर यांची भेट घेतली.
ससूनच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार उप-अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ. चंदनवाले यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सह-संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता त्या पदाचा पूर्णवेळ कारभार त्यांच्याकडे सोपवला गेला आहे.

….म्हणून रुग्ण दगावतात
डॉ. चंदनवाले यांनी आपल्या बदलीला दुजारो देतानाच एका वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली की, ‘पुणे येथे ससून रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेज हे एकच सरकारी रुग्णालय आहे. ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असून खाजगी रुग्णालयांमधील उपचार न परवडल्याने गरीब रुग्ण हे ससूनमध्ये येतात. त्याचप्रमाणे आधी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेक कोरोना रुग्णांना प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर ससूनमध्ये हलवण्यात आले होते. याच कारणास्तव ससूनमध्ये दगावलेल्या रुग्णांची संख्या जास्त दिसते.’