
वीजबिले थकल्याने महावितरणने ग्रामपंचायतींची वीजजोडणी तोडण्याचा धडाका लावला होता. आता महावितरणने शाळांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या 313 प्राथमिक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या प्रकारामुळे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून नुकत्याच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे गिरवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील दीड वर्षांहून अधिक काळ राज्यात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाशी लढा दिला जात आहे. या काळात राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद होती. त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख घसरत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र शाळा बंद असताना वर्षभरापासूनची वीजबिले थकीत असल्याने महावितरणने शाळांचे कनेक्शन तोडले आहेत.
जिह्यात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 161 शाळा आहेत. या शाळांची वीजबिले न भरल्याने सातारा तालुक्यातील 21, जावली 14, कराड 2, पाटण 107, कोरेगाव 3, खटाव 33, माण 82, फलटण 31, महाबळेश्वर 18, खंडाळा 1, वाई 1 अशा एकूण 313 शाळांमध्ये अंधार पसरला आहे. या प्रकारामुळे डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष व इतर अनेक सोयीसुविधा खंडित झाल्या आहेत.
कोरोनात दीड वर्षाहून अधिक काळ घरी असलेले विद्यार्थी नुकतेच शाळेत गेले असताना आता विजेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर मार्ग काढून विजेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
ग्रामपंचायतींच्या अकार्यक्षमतेचा फटका
n गावामधील प्राथमिक शाळांची वीजबिले ग्रामपंचायतीने भरणे बंधनकारक असते. मात्र, जिह्यातील 313 ग्रामपंचायतींनी शाळांची बिले न भरल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. राज्य शासनाने 15व्या वित्त आयोगातून बिले भरण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायतींनी बिले न भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शाळांना बसल्याचे दिसून येत आहे.

































































