
सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या व रविवारी तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या एका रुग्णाचा आज सकाळी अचानकपणे मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 2 कोविड-19 बाधित रुग्णांचे नमुने एनआयव्ही, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविण्यात आले होते. यापैकी 63 वर्षाचे पुरुष रुग्ण सकाळी स्वच्छतागृहात जाताना खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये अचाकन बिघाड झाला. ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केले. परंतु या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या पुरुषाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा, असा उपचार करणाऱ्या डॉक्टरचा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज एनआयव्ही, पुणे येथे आज पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दिल्ली येथे मरकजला भेट दिलेल्या एका 37 वर्षीय पुरुषाचा व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या 7 अनुमानित रुग्णांचे असे एकूण 8 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने आज एनआयव्ही, पुणे येथे आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तसेच कोविड-19 बाधित रुग्णाच्या सहवासात असणाऱ्या 17 ते 54 वर्ष वयोगटातील 9 नागरिकांना (पुरुष-4 व महिला 5) यांना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.





























































