सातारा जिल्ह्यातील सहा सराईत गुन्हेगार तडीपार, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद असणाऱया सातारा जिल्ह्यातील सराईत सहा गुन्हेगारांना जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या तडीपारांना आदेश जाहीर झाल्यापासून 24 तासांच्या आत तडीपारीच्या क्षेत्राबाहेर जावे लागणार आहे.

लोणंद पोलीस ठाण्यात राकेश ऊर्फ सोन्या भगवान भंडलकर (वय 21, रा. तांबवे, ता. फलटण), सौरभ संजय जगताप (वय 21, रा. सालपे, ता. फलटण) यांच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद होते. या दोघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडे सादर केला. त्यानुसार अंतिम सुनावणी होऊन भंडलकर आणि जगताप यांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातून तसेच पुण्याच्या बारामती, पुरंदर, भोर आणि सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

उंब्रज पोलीस ठाण्यात अक्षय शंकर पाटोळे (वय 23, रा. पाटोळे वस्ती, शिरसवडी, ता. खटाव, सध्या रा. मसूर), राहुल चंद्रकांत जाधव (वय 21), शरद संजय चव्हाण (वय 21), प्रसाद श्रीरंग जाधव (वय 20, तिघेही रा. मसूर, ता. कराड) यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद होते. त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावरील अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पाटोळे, जाधव, चव्हाण आणि प्रसाद जाधव या चौघांना एक वर्षाकरिता जिल्ह्यातून तसेच सांगलीच्या कडेगाव, खानापूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतून तडीपार करण्याचे आदेश बन्सल यांनी दिले.