
कोरोना संकटाच्या सावटातही आज सातारा जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या शाळांनी नव्या उमेदीने ‘पुनश्च हरिओम’ केले. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या ध्यासातून बहुतांश पालकांनीही काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवले. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर आज पहिल्याच दिवशी 68.24 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे प्रदीर्घकाळ शाळा कुलूपबंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याचा मुलांच्या ज्ञानावर, आकलनावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जोखीम नको म्हणून शाळा बंद ठेवण्याला पाठिंबा देणारा पालकवर्ग आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या चिंतेमुळे ही जोखीम घेण्याच्या मानसिकतेपर्यंत आला आहे. जानेवारी उजाडल्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या भूमिकेला पालकांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे.
याचाच परिपाक म्हणून आजपासून जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शाळा सुरू होताना पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या 3804 इतकी असून, त्यापैकी 3713 (97.61) टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण 4 लाख 42 हजार 790 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 2 हजार 153 विद्यार्थ्यांनी (68.24 टक्के) आज शाळेत हजेरी लावली. शिक्षकांची उपस्थितीदेखील 96.60 टक्के नोंदवली गेली आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी दिली.




























































