अवघ्या 400 रुपयांत कोळपे! 73 वर्षीय अशोक जाधव यांनी बनवलं शेतीसाठी उपकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोळपं उपकरणामुळे कोळपणीच्या समस्या बऱयाच प्रमाणात कमी झाल्या आहेत. हे उपकरण 10 मजुरांचे काम करू शकते. त्याचा निर्मिती खर्चही कमी आहे. सुरुवातीला आतापर्यंत असे हजारो कोळपे शेतकऱयांना उपलब्ध करून दिले आहे. ऊस, गहू, ज्वारी, हळद, भुईमूग, आलं, ज्वारी, गहू अशा सगळ्या पिकांचे तण काढता येतात. याला देशभरातून मागणी येत आहे, असे अशोक जाधव यांनी दैनिक ‘सामना’ शी बोलताना सांगितले.

सातारा जिह्यातील चिंचनेर येथील 73 वर्षीय शेतकरी अशोक जाधव यांनी शेतीच्या कामात अतिशय उपयुक्त ठरेल, असे कोळपे तयार केलंय. राष्ट्रीय स्तरावर अशोक जाधव यांच्या कल्पकतेची दखल घेतली जात आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर केरळ, आसाम अशा अन्य राज्यांतील शेतकऱयांपर्यंत हे अनोखे कृषी अवजार पोहचले आहे. अवघ्या 400 रुपयांत हे कोळपे शेतकऱयांना उपलब्ध करून दिले जात आहे.

अशोक जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी शेतातील तण काढण्यासाठी (कुळपणी) कुळपं तयार केले. जाधव सेंद्रिय शेती करतात. बऱयाचदा शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. शेतमजुरीवर खर्चही जास्त होतो. सेंद्रिय शेती असल्याने तणनाशकांचा वापर त्यांना करायचा नव्हता. अशा वेळी तण काढणारे कोळपे कमी खर्चात तयार करता येईल का या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणला. जाधव यांनी बनवलेल्या उपकरणाचे कृषी अधिकाऱयांनीही कौतुक केले आहे. उपकरणाला आता देशभरातून मागणी येत आहे.

अशी केली निर्मिती

कोळपणी यंत्र बनवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला दोन लोखंडी गज घेतले. त्याची दोन टोके वाकवली. मधोमध 8 ते 10 इंच लांबीची पातळ धातूची तार बसवली. नंतर दोन्ही टोकांना एका धातूच्या पाइपसोबत जोडून त्याचे हँडल केले. मात्र तारेवर ताण कमी येणे, वजनाला जड अशा समस्या येऊ लागल्या. अनेकदा मोठय़ा तणांना काढून टाकताना तार तुटायची, हाताला जखम व्हायची. या सगळ्या समस्यांचा विचार करत उपकरणावर त्यांनी दोन वर्षे सातत्याने बदल केले. त्यांनी पुण्यात मशिनिस्ट म्हणून काम केले होते. तो अनुभव कामी आला. वजन कमी करण्यासाठी लोखंडी पाइपऐवजी लाकडी दांडय़ाचा वापर केला. भरीवऐवजी पोकळ पाइपचा वापर केला. आता उपकरण अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. तण काढण्यासाठी उपकरण सक्षम झाल्याचे अशोक जाधव यांनी सांगितले.