लॉकडाऊनविरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात ‘भीक मांगो’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी पोवई नाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोते टाकून थाळी ठेवून ‘भीक मांगो’ आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर टीका केली.

या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘भीक मांगो’ आंदोलन करीत जमा केलेले 450 रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली. ‘गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी कायम उभा राहणार असून, राज्य शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा,’ असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीकेण्ड लॉकडाऊनचा निर्णय शासनाने आनंदाने घेतला नसून, जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा हा उपाय आहे. त्यामुळे ‘भीक मांगो’ आंदोलन करणे योग्य नसल्याचा सल्ला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.