स्वाभिमान डिवचणाऱ्यांना कोल्हापूरकर चोख उत्तर देतील, पालकमंत्री सतेज पाटील यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर शहर वेगळे आहे. भाजपधार्जिणे नाही. कोणी स्वाभिमान डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद कोल्हापूरकरांमध्ये आहे. भाजपने कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करून जयश्री चंद्रकांत जाधव यांना कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून संधी द्यायला हवी होती. मात्र, आता विरोधात डबे देऊन मते मागणाऱयांनाच शहरातील जनता डब्यात बंद करतील, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांतील प्रमुख पदाधिकाऱयांचा मेळावा संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात सायंकाळी पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के पोवार, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, रिपाइं (कवाडे गट) जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर उपस्थित होते.

अरुण दुधवडकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेसंदर्भात घेतलेला निर्णय सर्व शिवसैनिकांना मान्य आहे. शिवसेना कधीही दगाफटका करत नाही. या निवडणुकीत शिवसैनिक भाजपचे 12 वाजवतील, असेही ते म्हणाले.

खासदार माने म्हणाले, कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर असून, येथील राजकारण वेगळे आहे. जिह्यातील संपूर्ण शिवसेना जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संजय पवार यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश सर्व शिवसैनिक पाळतील यांची ग्वाही दिली.

महाविकास आघाडी म्हणून जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.