
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील पिकांचे यावर्षीपासून सॅटेलाईट सर्वेक्षण होणार आहे. सॅटेलाईट इमेजच्या आधारे पिकांच्या नोंदी केल्या जातील, त्याआधारे पाणीपट्टी निश्चित केली जाईल. त्याबाबत काही तक्रारी आल्या, तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा केला जाणार आहे. या बदलाने पाणी वापराच्या नोंदी नेमकेपणाने होतील आणि पाणीपट्टी वसुलीचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाला आहे.
यावर्षी कोयना, वारणा, धोम, कण्हेर, उरमोडी ही सारी धरणे शंभर टक्के भरली आहेत. परिणामी, सिंचन योजनांसाठी यंदा पूर्ण क्षमतेने पाणीउपसा करता येणार आहे. जानेवारी ते मे अखेर योजना प्रभावीपणे चालवता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याची माहिती पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली. उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ तीनही योजनांचे सर्व पंप दुरुस्त करण्यात आले आहेत. 30 पैकी 29 पंप उपसा करायला सज्ज आहेत. काही ठिकाण दरड कोसळली होती. शिंदेवाडीत गळती झाली होती. ती कामे अंतिम टप्प्यात आहेत. जतला अस्तरीकरणाचे काम 70 टक्के झाले आहे. पुलाची कामेही पूर्ण होत आहेत, त्यामुळे आवर्तनात अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता शेतकऱयांच्या पाणी मागणीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यासाठी सात नंबरचा अर्ज भरून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘म्हैसाळ’चे चाचणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही तांत्रिक कारणास्तव, पंप बंद पडले म्हणून आवर्तनात खंड पडू नये, यासाठी तीन वर्षांचा खरेदी व दुरुस्तीचा एकत्रित ठेका देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच्या निविदा लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, जेणेकरून छोटय़ा-मोठय़ा अडचणीवेळी स्वतंत्रपणे मान्यता घेणे, निविदा काढणे, यात वेळ जाणार आहे. गत आठ-दहा वर्षांतील अनुभवाच्या आधारे ही रचना करण्यात आली आहे.
पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वसुलीचा प्रश्न अद्यापि गंभीर आहे. किमान योजनांच्या वीज बिलापुरती पाणीपट्टी वसूल व्हावी, असा पाटबंधारे विभागाचा प्रयत्न आहे. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. टेंभू योजनेचे वीज बिल 55 ते 60 कोटी, म्हैसाळ योजनेचे सुमारे 50 व ताकारी योजनेचे वीज बिल सुमारे 15 कोटी रुपये येते. शेतकऱयांनी किमान वीज बिलापुरती पाणीपट्टी भरावी, यासाठी पाटबंधारे विभागाकडून यावर्षी अधिकचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी सांगितले.




























































