
सृष्टीची निर्मिती, सजीवांचे उत्क्रांती, या सृष्टीची रचना याविषयी मानवाला पडलेलं कोडं आणि धर्म, अध्यात्म आणि विज्ञानाच्या मार्गातून त्याचा घेण्यात आलेला शोध याविषयीचा इतिहास उलगडून दाखवणारी आणि सत्याचा शोध घेणारी एक जबरदस्त वेबसिरीज ‘सत्यान्वेष’ आज म्हणजेच 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होत आहे.
‘अलबर्ट्स वर्ल्ड प्रोडक्शन’ने या वेबसिरीजची निर्मिती केली असून याच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सृष्टी निमिर्तीच्या सत्याचा विविध अंगानी शोध घेणारी ही हिंदुस्थानातील पहिलीच हिंदी वेबसिरीज असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच हिंदी पाठोपाठ मराठी, गुजराती, तमीळ, तेलगू अशा विविध हिंदुस्थानी भाषांमध्ये ही सिरीज आणण्याचा विचार असल्याचे कळते आहे. या सिरीजचे एकूण 11 एपिसोड असल्याचे कळते आहे.
वृक्ष-वनस्पती, प्राणी, मानव ही सजीव सृष्टी कोणी निर्माण केली? कोणत्याही सजीवाची पुढली पिढी त्याच्या सारखीच कशी असते? मानवाच्या बाबतीतही हाच नियम आहे. मग मानव प्राण्यांमधीलच एक आहे निर्मात्याने त्याला विशेष बनवलं आहे? कोण आहे या सृष्टीचा निर्माता? या प्रश्नांमधून अनेक मतप्रवाहांना जन्म दिला तर याच प्रश्नांनी हिंसा देखील केल्याचे असंख्य दाखले आहेत. मात्र गेल्या 400 वर्षात या सृष्टी निर्मितीच्या प्रश्नांकडे वैज्ञानिक नजरेतून पाहिले गेले आणि असंख्य नवनव्या गोष्टी उलगडत गेल्या आहेत. हिंदुस्थानच्या दर्शन शास्त्रांपासून सुरू असलेला सत्याचा शोध आज वैज्ञानिक पातळीवर घासून घेतला जात आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा धर्म, विचारधारा, विज्ञान, अशा विविध मार्गांनी सत्याचा शोध घेणारी एक हिंदी वेबसिरीज 1 डिसेंबरपासून आपल्या भेटीला येत आहे. ‘सत्यान्वेष-सर्च फॉर ट्रूथ’ (Satyanvesh – Search For Truth) असे या वेबसिरीजचे नाव आहे.
या वेबसिरीजचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाण्याची बिलकूल गरज नाही तर युट्यूब चॅनेलवर ही सिरीज सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणारी सिरीज देशातील अंतिम व्यक्तीपर्यंत विनामूल्य पोहोचावी असा ‘सत्यान्वेष’चे लेखक-दिग्दर्शक रोहित मिश्रा यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीची ओटीटी प्लॅटफॉर्म ऐवजी ही सिरीज त्यांनी यूट्युबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
‘सत्यान्वेष’चे लेखन-दिग्दर्शन रोहित मिश्रा यांनी केले असून सध्या ते जर्मनी येथे संशोधनात व्यस्त आहेत. आराधना मिश्रा या निर्मात्या आहेत तर योगी सिंह यांनी देखील मिश्रा यांना साथ देत दिग्दर्शकाची भूमिका निभावली आहे. मराठमोळ्या संदीप डिकले यांनी देखील या सिरीजसाठी क्रेएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. अयान हाश्मी यांनी एडिटिंगचे काम केले आहे.
गेल्या 4 ते 5 वर्षात हिंदुस्थानातील वेबसिरीज चांगल्याच हिट ठरल्या आहेत. आकर्षक मांडणी, ‘स्लँग लँग्वेज’, जबरदस्त संगीत, सत्यघटना नाट्यमयरित्या मांडली जात असल्याने तरुणांमध्ये याची क्रेझ वाढत गेली आहे. मात्र अनेकदा या वेबसिरीजमधून विक्षिप्त, वंगाळपणाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे आरोप झाले आहेत. असे असले तरी काही सिरीज, डॉक्युमेंट्री फिल्म, वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवणाऱ्या सिरीज देखील यातून पुढे येऊ लागल्या आहेत.
समाज माध्यमं आणि ओटीटी सारख्या आधुनिक माध्यमांमधून देखील विज्ञाननिष्ठ विचार आणि चांगला कंटेट लोकांपर्यंत पोहोचवल्यास त्याचे चांगले परिणाम होतील. गावागावातील विद्यार्थ्यांपर्यंत अशी चांगली सिरीज पोहोचली तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जागरुक होईल असा विश्वासही या सिरीजच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
























































