माझा आवडता माझा आवडता बाप्पा :।। मोरया मोरया ।।

486

>> सावनी रवींद्र

 • तुझं आवडतं दैवत? : गणपती बाप्पा. मी चिंचवडची आहे. तिथलं मोरया गोसावींचं देऊळ. लहानपणापासून त्या परिसरात वाढल्यामुळे माझं गपणतीबाप्पाशी एक वेगळं नातं आहे.
 • त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? : खूप भाग्यवान समजते स्वतःला की, मी गायिका आहे. ही मला देवाचीच देणगी आहे. गळ्यात सूर आहेत त्यामुळे माझ्या सुरांनी मी त्याला आळवू शकते. केव्हाही त्याची भक्ती करू शकते. कारण गायनाच्या माध्यमातून केली जाणारी भक्ती ही श्रेष्ठ असते. गणपतीची बाप्पाची भक्ती त्याची गाणी गाऊन करते. जेव्हा चिंचवडला असेन तेव्हा आवर्जून दर्शनाला जाते.
 • संकटात तो कशी मदत करतो, असं वाटतं? : ध्यानीमनी आपलं दैवत असतंच. फक्त संकटातच नाही, तर चांगल्या गोष्टीतही देवाची कृपा जाणवत असतं. संकटाच्या वेळी पहिली धाव आपण त्याच्याकडे घेतो. एखादा कार्यक्रम आहे, पण आवाज बरोबर नसेल तेव्हा त्याच्या चरणी सगळं अर्पण करते, तू करून घे, असं म्हणते. अशी भाबडी भक्ती करते.
 • कला आणि भक्तीची सांगड कशी घालतेस? : सांगड देवाने आधीच घातलेली आहे. मला वाटेल तेव्हा गाणं गाऊन त्याची भक्ती करू शकते.
 • तुझ्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? : माझे आई-बाबा दोघेही शास्त्रीय गायक आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपाने मला बाप्पा दरवेळेस जाणवत असतो. त्यांच्यामध्येही मला देव दिसतो, कारण त्यांनी आजपर्यंत मला प्रचंड साहाय्य केलंय. जेव्हा जेव्हा अडथळे आले, तेव्हा बाप्पा एखादी गोष्ट समोर आणून ठेवायचा. त्यातून काहीतरी मिळत गेलं.
 • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? : असं ठराविक सांगता येत नाही, कारण नेहमीच प्रार्थना करत असते. शिवाय त्याने काही द्यावं म्हणून प्रार्थना करत नाही. कारण त्याने खूप काही दिलय. त्याची जोपासना करणं हेच माझं कर्तव्य आहे. आयुष्यात अडथळे जरी आले तरी तेही त्याने मला दिलेले धडेच आहेत. त्याकडे मी नकारात्मक दृष्टिकोनातून बघत नाही, कारण तोही माझ्या जीवनाचा एक भाग आहे. हे अनुभवही बाप्पा मला देतो याचा मला आनंदच वाटतो.
 • त्याच्यावर रागावता का? : हो, कधी कधी.
 • देवबाप्पा तुझे लाड कसे पुरवतो? : चांगले आई-वडील, वातावरण त्याने मला दिलंय. माझी कला. इतक्या वर्षात जे काही मिळवलंय किंवा इथून पुढे जे मिळणार आहे, सतत त्याने मला गातं ठेवलंय, सतत काम करतेय ही त्याची कृपा आहे.
 • आवडत्या दैवताचे कोणतं स्वरूप आवडतं? : सगळीच रुप आवडतात. विशेष करून मोरया गोसावींच्या देवळातली गपणपतीची मूर्ती खूपच आवडते.
 • त्याच्यापाशी काय मागता? : काहीच नाही, कारण त्याने न मागताच खूप दिलंय. इच्छा एवढीच आहे की, मी सतत गात राहावं आणि माझी गाण्याची कला त्याच्या आशीर्वादाने अजून वृद्धिंगत व्हावी.
 • त्याच्या आवडीचा नैवेद्य? : उकडीचे मोदक बनवायला आवडतात त्यामुळे ते आवर्जून करतेच आणि नैवेद्य दाखवते.
 • त्याची नियमित उपासना कशी करतेस? : गणपती स्त्रोत्र आणि अथर्वशीर्ष पठण करते.
आपली प्रतिक्रिया द्या