
मुंबईतील गरीब आणि बेघर लोकांसाठी अन्नपेट्या सुरू करण्याची गरज असल्याचे सांगतानाच मुंबईकरांनी पाणी आणि विजेचा योग्य वापर करून त्याची बचत करावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी मुंबई कचरामुक्त-खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार, असा संकल्प त्यांनी केला. जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आदिवासी भागात अन्नपाण्याविना उपासमारीने मुले मरतात. शहरी भागातही गरीबांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. त्यामुळे इंदूरच्या धर्तीवर लोकांसाठी आणि भटक्या प्राण्यांसाठी अन्नपेट्या तयार करण्याची गरज आहे. मुंबईकरांनी वीज आणि पाण्याची बचत करावी तसेच आपले शहर कचरामुक्त करण्यासाठी कचर्याचे योग्य ते नियोजन करावे. कचरा थेट डंपिंग ग्राऊंडवर न नेता तो एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला जातो त्यामुळे खर्च वाढतो. त्यामुळे कचरा जिथे निर्माण होतो तिथेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करू, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्यांनी कचरामुक्त आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा संकल्प पुन्हा बोलून दाखवला.
मुंबईत आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरपासून अग्निसुरक्षेची मोहीम राबवली जात आहे. रासायनिक कारखाने शहरात नको अशी पालिकेची भूमिका आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, मुंबईकरांनी सण आणि समारंभावेळी, वाढदिवसावेळी दोन तरी झाडे लावावीत, भटक्या प्राण्यांना दत्तक घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
























































