झाडे वाचवा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत येरम,[email protected]

आता पुन्हा नव्याने पर्यावरणाचे महत्त्व सुशिक्षितांनाही सांगण्याची, शिकवण्याची वेळ आली आहे…

शहरातील विविध भागांमध्ये भर रस्त्यात उंच वाढलेली झाडे आता काही प्रमाणात वाळलेली किंवा छाटलेली पाहायला मिळत आहेत. याला बरीच कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे सुशोभिकरणाचे नाव पुढे करून त्या झाडांना मारले जात आहे. नुकतेच मुंबईतल्या बोरिवलीमधील काही झाडांवर चक्क विषप्रयोग करण्यात आला. आणि त्या सजीव झाडांचा बळी देण्यात आला. हो हो बळीच देण्यात आला. वाईट याच गोष्टीचे वाटते की अगदी शाळेतल्या मुलांपासून ते महाविद्यालयातल्या तरुणाईपर्यंत सर्वचजण बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत, की पर्यावरण राखा, झाडे लावा झाडे जगवा… तर दुसरीकडे मात्र त्याच पर्यावरणाला पूरक असणाऱया झाडांचा असा बळी दिला जात आहे.

काही ठराविक वयोमर्यादेनंतर तसेच खोडकीड, वाळवी लागल्यामुळेही वृक्ष वाळतात; मात्र याच कारणांचा ‘आधार’ घेत रसायनाचे ‘डोस’ डौलदार झाडांना देऊन हिरव्या झाडांची वाढ संपुष्टात आणण्याचे प्रकार शहर व परिसरात सर्रास सुरू आहेत. मुंबई आणि उपनगरात पिढय़ान्पिढय़ा जोपासण्यात आलेल्या डेरेदार वृक्षांवर विषाची ‘संक्रांत’ आली आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी डेरेदार वृक्षांवर विषप्रयोग करीत त्यांना मुळासकट मारण्याचा कट आखत तो साध्यही केला जात आहे. त्यात खोडकीड, वाळवी, उदयी मातीसारखी दिसणारी पृमीची बुरशी लागल्यामुळे झाडाचा जीव धोक्यात येतो आणि बहरलेली झाडेदेखील वाळतात.

झाडे लावा, झाडे जगवा, त्यांचे संगोपन करा

कोणती झाडे लावायची याचा विचार करून ती झाडे लावा. महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांत, कोरडय़ा हवेत, दमट हवेत, पाणी असलेल्या ठिकाणी, पाणी नसलेल्या ठिकाणी कोणती झाडं लावावीत, सावली देणारी झाडं कोणती, निसर्ग चक्र वाढविणारी झाडे कोणती, फळं देणारी झाडं कोणती, शहराच्या सुशोभीकरणासाठी कोणती झाडं याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचे जणू पेव फुटते! परंतु पावसाळय़ात वा त्यानंतर कोणती झाडे लावावीत याविषयी बऱयाच जणांना माहितीच नसते वा ती करून घेण्याची तसदीही घेतली जात नाही. मात्र अशी रोपे लावल्यानंतर त्यांची पुरेशी काळजी घेतली नाही तर ती रोपे बराच काळ तग धरू शकत नाहीत.

मुंबईतल्या पूरक पर्यावरणात तग धरू न शकणारी, वादळ-वाऱयात उन्मळून पडणारी अशी झाडे लावू नका. पर्यावरण पुरक, उपयोगी, निसर्गचक्राचे रक्षण करणारी, औषधी गुणधर्माने उपयुक्त झाडे लावणे अगत्याचे आहे. औषधी वनस्पतीत झाडांत आंबा, जांभूळ, चंदन, आवळा, पळस, हिरडा, बेडहा, शेवगा, कडूनिंब, वड, पिंपळ, नारळ, कदंब, पुटज, कवठ, बेल, सप्तपर्णी, औदुंबर, रोहितक, वरुण, अर्जुन, अग्निमंथ, आरग्वध, शिरीष, पारिजातक, शाल्मली, पुत्रजीवक, रोहितक, निर्गुण्डी, खदीर, पुटज, सिताअशोक अशा झाडांची लागवड पण जागेची पाहणी करूनच या झाडांची निवड केल्यास ते जास्त श्रेयस्कर ठरेल.

हे करा आणि पर्यावरण राखा…

शाळा, महाविद्यालयातील मैदानाच्या जागेत वड, पिपळ, आंबा, हिरडा, बेहडा, कदंब, कडुनिंब आदी डेरेदार पसरणारी मोठी झाडे लावावीत.

देवळच्या आजूबाजूला बेल, पारिजातक, औदुंबर, वड, नागचाफा, जास्वंद, तुळ्स अशी धार्मिक कार्यामध्ये वापरात येणारी झाडे लावावीत.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी जसे स्मशानभूमी, बाजाराची जागा इत्यादी ठिकाणी जास्त प्रमाणावर कचरा न करणारी, बिनकाटय़ाची, नेहमी हिरवी असणारी, उंच वाढणारी झाडे लावावीत. गर्दीच्या ठिकाणी उंच जाणारी तसेच उंचावर जाऊनही न पसरणारी बकूळ, आकाशनिंब, खोटा अशोक अशी झाडे लावावीत.
प्रदूषित वातावरणाला दिलासा म्हणून जास्त ऑक्सिजन सोडणारी झाडे लावावीत. निसर्गतज्ञांच्या माहितीनुसार बागेत वड, पिंपळ, उंबराचं झाड असल्यास अश झाडांवर पक्षी, फुलपाखरे, सरडा व खारी यांचा वावर जास्त प्रमाणावर असतो. शिवाय तिथे त्यांच्या प्रजननालाही पोषक वातावरण असते.

रस्त्याच्या कडेला उंच सरळ वाढणारी, वाहतुकीला अडथळा होणार नाही तसेच शोभिवंत अशी नारळ, शाल्मली, बहावा, अशोक, नागचाफा, सोनचाफा, रक्तरोहिडा, आकाशनिंब ही सौंदर्य, मनमोहकता वाढवणारी झाडे लावावीत.