
भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात दगावलेल्या चारही बालकांची प्रकृती गंभीरच होती. त्यामुळेच त्यांच्यावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ही चारही बालके बाहेरील रुग्णालयात जन्मल्यानंतर प्रकृती खालावल्याने या रुग्णालयात आणली गेली होती. त्यांची प्रकृती आणखीनच खालावली गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी प्रसूतीगृहाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
पालिकेच्या भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात 19 ऑगस्टपासून इंडियन पेडियाट्रिक प्रायव्हेट लि. या बाह्य संस्थेकडून 20 एनआयसीयूची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रसूतीगृहात जन्मलेल्या बाळांसाठी 10 बेड तर बाहेरून अत्यवस्थरीत्या दाखल होणाऱया बाळांसाठी 10 बेड राखीव आहेत. यानुसार ही बालके दाखल करण्यात आली होती. यामध्ये 14 डिसेंबर रोजी दाखल झालेले बाळ 20 डिसेंबर रोजी, 12 डिसेंबर रोजी दाखल झालेले बाळ 21 डिसेंबर रोजी, 15 डिसेंबरला दाखल झालेले बाळ 22 डिसेंबर रोजी आणि 16 डिसेंबर रोजी दाखल केलेल्या बाळाचा आज मृत्यू झाला. यामधील गंभीर बाळांमधील एका बाळाची वाढ पूर्ण झाली नव्हती, एकाचे वजन कमी होते, एकाला डायरिया तर एक अत्यवस्थ होते, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, बालकांच्या मृत्युप्रकरणी भाजपने आज पालिका मुख्यालयात महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
सात दिवसांत अहवाल देणार
या चौकशीसाठी शीव रुग्णालयाच्या नवजात शिशु आणि अतिदक्षता विभागाचे प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि बालरोगतज्ञ यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या चौकशीमधून बालकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर येईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकशीसाठी पालिकेकडून कमिटी स्थापन, पालिका म्हणते…
वैद्यकीय क्षेत्रात एनआयसीयूमध्ये 10 टक्के मृत्युदर असतो. मात्र संबंधित एनआयसीयूमध्ये पाच ते सहा टक्के राहिला आहे. मात्र सलग चार बालके दगावल्यानंतर मृत्युदर 7 टक्के झाला असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, 3 डिसेंबरपासून प्रसूतीगृहात दाखल झालेल्या सातपैकी दोन बालकांची प्रकृती स्थिर तर एक बालक व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृतीही सुधारत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
एनआयसीयूत दाखल करण्यात आलेली नवजात बालके अँटिबायोटिकला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे सेप्टिक शॉकने मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मालाड, ओशिवरा, मुलुंड आणि चित्ता कॅम्प या ठिकाणाहून या बालकांना दाखल करण्यात आले होते.





























































