दुर्मिळ होत चाललेल्या सायाळ प्राण्याची नांदुर्गा शिवारात शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील नांदुर्गा शिवारात दुर्मिळ होत चाललेल्या सायाळ प्राण्यांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ हा तेरणा नदीकाठचा परिसर म्हणून ओळखला जातो त्यामुळे या परिसरात सायाळ, हरिण, मोर, ससा, रानडुक्कर आदी प्राण्यांचा वावर हा नेहमी पहावयास मिळतो. परंतु सध्याच्या काळात दुर्मिळ होत असलेल्या सायाळ प्राण्याची शिकार करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सायाळ हे कुडतरणाऱ्या प्राणी वर्गातील प्राणी आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या शरीरावरील केसाचे काट्यात रुपांतर होते. सायाळ हा खुल्या किंवा दाट जंगल क्षेत्रात तसेच खडखाळ व डोंगराळ भागात राहून त्या क्षेत्राशी अनुकूल साधणारा निशाचर प्राणी आहे. त्याच्या अंगावरील काटे अतिशय तिक्ष्ण असतात व तसेच अंगावरील काटे फुलवून येणाऱ्या संकटापासून तो स्वतःचा बचाव करतो. त्यामुळे अशा ह्या दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याचा बचाव करण्यासाठी संबंधित विभागाकडून शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील प्राणी मित्रांकडून होत आहे.