‘चौकीदार’वरील शेऱ्याने राहुल गांधी अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाने धाडली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणी घेरण्याच्या प्रयत्नात ‘चौकीदार चोर है’ असे वारंवार म्हणणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वत:च फसले आहेत. ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केल्याच्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले असून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे. तसेच ‘येत्या 22 एप्रिलपर्यंत याबद्दलचे स्पष्टीकरण द्या,’ असेही आदेश देण्यात आले आहेत.

‘राफेल प्रकरणात न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणतंही मतप्रदर्शन केलेले नाही. राहुल गांधींनी त्याचा विपर्यास केला आहे,’ असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर राहुल गांधी चांगलेचे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

संरक्षण विभागातील ‘राफेल’ ही लाढाऊ विमाने खरेदी प्रकरणात नवी माहिती समोर आल्याने त्यावर फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. तसेच या करारतील लीक झालेले कागदपत्र खटल्यावेळी ग्राह्य धरले जातील असेही सांगण्यत आले होते. या निर्णयावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करत चौकीदार चोर आहे, हे न्यायालयानेही मान्य केल्याचे विधान केले होते.

या प्रकरणी भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि न्यायालयात दाद मागितली. ‘राहुल हे स्वत:ची मते सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ अशा आशयाची याचिका मिनाक्षी लेखी यांनी केली होती.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने राहुल यांना नोटीस बजावली.