त्या नराधमांना फाशीच! ‘निर्भया’ला न्याय मिळणार , फेरविचार याचिका फेटाळली

260
supreme-court

राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक नराधम अक्षयकुमार सिंहची फेरविचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांच्याही फेरविचार याचिका यापूर्वीच फेटाळल्या आहेत. त्यामुळे नराधम दोषींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात वर्षांनंतर तरी आता पीडित ‘निर्भया’ला न्याय मिळण्याची आशा आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने अवघा देश हादरला. या घटनेत राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, तसेच विनय शर्मा, पवन गुप्ता, अक्षयकुमार सिंह आणि एका अल्पवयीन आरोपींना अटक केली. त्यातील अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युवेनाईल कोर्टात चालला. इतर पाच दोषींना फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम राहिली आहे. यातील नराधम दोषी राम सिंहने तिहार कारागृहात आत्महत्या केली. उरलेल्या चार दोषींपैकी पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांच्या फेरविचार याचिका यापूर्वीच न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

‘डेथ वॉरंट’वर 7 जानेवारीला सुनावणी होणार

‘निर्भया’च्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फासावर लटकवा, त्यासाठी ‘डेथ वॉरंट’ जारी करा, अशी मागणी करणारी याचिका पतियाळा हाऊस कोर्टात दाखल केली आहे. याचिकेवर आता 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

सात वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा करत आहोत

सर्वोच्च न्यायालयाने दोषींची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. सात वर्षांपासून न्यायाची प्रतिक्षा करत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे समाधान आहे. मात्र, डेथ वॉरंट लवकरात लवकर जारी केले पाहिजे. किती वर्षे आम्ही वाट पहायची, असा सवाल ‘निर्भया’च्या आईने केला आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

माफी नाही; फाशी कायम

अक्षयकुमार सिंहने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने आज याचिका फेटाळून लावली. दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेमुळे माणसे मरतात. फाशीची शिक्षा देऊ नका, असा युक्तिवाद अक्षयकुमारच्या वकिलांनी केला. मात्र, खंडपीठाने हा युक्तिवाद आम्ही आधीच ऐकून घेतला आहे असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या