
सामना प्रतिनिधी । मुंबई
सातत्याने होणारी पेट्रोल-डिझेल दरवाढ, टोलमुक्ती, शाळेजवळ पार्किंगची सोय यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील स्कूल बसेसनी उद्या शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे. या बंदमुळे स्कूल बसने शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.
‘स्कूल ऍण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशन’ने हा बंद पुकारला आहे. स्कूल बसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणाऱया पालकांनी उद्याच्या दिवस स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ थांबवावी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीअंतर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोलनाक्यांवर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, विमा हप्त्यात कपात करावी, स्कूल बसच्या चेसिसवरील एक्साईज डय़ुटी माफ करावी, आरटीओकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करून ती स्कूल बस सुरक्षा समितीकडून करावी, शाळेभोवती स्कूलबसना पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये स्कूल बससह लक्झरी बस, टेम्पो, खासगी कॅब, टुरिस्ट कार आदी वाहनेही सहभागी झाली आहेत.






























































