पाडलेली शाळा बांधणार कधी; पिंपळगावमधील ग्रामस्थांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीतील पालम शहरापासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या पेठपिंपळगाव प्रशालेत 5 वी ते 10 वी पर्यंतचे 123 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील 10 महिन्यांत शाळेचे बांधकाम करून नवीन खोल्या बांधणे अपेक्षीत असताना ठेकेदाराने 7 खोल्या पाडून ठेवल्या आहेत. 10 महिने उलटून गेले तरी, फक्त तीनच खोल्या पाडून उरलेल्या चार खोल्या भग्नावस्थेत आहेत. शाळा बांधायाला आणखी किती वर्षे लागतील आणि संबंधित ठेकेदाराला कोण पाठीशी घालून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहे याची चौकशी करा, अशी मागणी करत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरापासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या पेठपिंपळगांव येथे जिल्हा परिषदेची निजाम काळातील बांधलेली शाळा होती. शाळा बांधून अनेक वर्षे झाल्याने शाळेची दूरवस्था झाली होती. भिंतींना जागोजागी भेगा पडल्या होत्या. शाळा धोकादायक असल्याचे मुख्याधापकांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावाने जिल्हा परीषदेकडे लेखी कळवले. या शाळेच्या बांधकामसाठी मंजुरी मिळाली. शाळेच्या 7 खोल्या पाडण्याची सूचना 20 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्या. 15 दिवसात खोल्या पाडून इमारतीचा ढिगारा गावाबाहेर टाकणे, इमारत पाडली ती जागा समांतर करून देण्याच्या अटीवर संबंधित ठेकेदारांना कामाचा ठेका देण्यात आला होता. परंतु दहा महिने उलटून गेले तरी, फक्त तिनच खोल्या पाडून उरलेल्या चार खोल्या भग्नावस्थेत उभ्या आहेत. ज्या खोल्या पाडल्यात त्याचे दगड-मातीचे ढिगारे जागोजागी पडलेले आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. किचनशेड व इतर ठिकाणी सध्या शाळेचे वर्ग कसेबसे चालविले जात आहेत.

याबाबत मुख्याध्यापक क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता यांनी वेळोवेळी वरिष्ठांना पाठपुरावा केल्याचे लेखी पत्र दाखविले. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी व गटशिक्षणाधिकारी, पालम यांना वेळोवेळी लेखी कळवूनही आजपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नाही. 10 महिन्यात शाळेच्या 7 खोल्या पाडता येत नसतील तर,शाळा बांधायाला आणखी किती वर्षे लागतील ? आणि संबंधित ठेकेदाराला कोण पाठीशी घालून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहे, याची चौकशी करा अशी मागणी पालकांनी केली आहे.