भंडारा : शहरी व ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

74


सामना प्रतिनिधी, तुमसर

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात आजार फोफावतात. त्यामुळे घरांमध्ये मुलांच्या आरोग्यासाठी आपण विविध उपाययोजना राबवितो. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी अशा कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही. विहीर, बोअरचे पाणी शाळेच्या टाकीत साठवून, नळाच्या माध्यमातून पुरविले जाते. अनेक शाळांमध्ये या टाक्याही वर्षानुवर्षे स्वच्छ केल्या जात नाही. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. काही नामांकित शाळा सोडल्यास आजही अनेक शाळांमध्ये विहीर, बोअरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. अनेक शाळांमध्ये विहीर व बोअरचे पाणी शाळेच्या पाण्याचा टाकीत साठविले जाते व विद्यार्थी त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. शहरी व ग्रामीण भागातही खासगी संस्थेसह जिल्हापरिषदच्या अनेक शाळांमध्ये हा सर्रास प्रकार चालतो आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ‘आरो’ लावण्यात आले आहे. त्यातही अनेक शाळेचे ‘आरो’ बंद आहेत.

सर्वच विद्यार्थी घरून पिण्याच्या पाण्याची बॉटल घेऊन येत नाही. नाईलाजास्तव त्यांना शाळेचे पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्हापरिषदच्या अनेक शाळांतील पिण्याच्या पाण्याचे फिल्टर नादुरुस्त आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. फक्त दर्शनी भागात फिल्टर किंवा कॅन ठेवला जातो व त्यात बोअरचे पाणी भरले जाते. शिक्षण विभाग या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. या विषयाचा निवेदन पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विजय आदमाने यांना शिवसेनेचा वतीने देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, बेरोजगार कृती समितीचे संयोजक अमित एच. मेश्राम, शहर प्रमुख नितीन सेलोकर, समितीचे सचिव रविंद्र महाकाळकर, सदस्य सूरज वैद्य, आशिष वंजारी, मुरली पटले, बाळा ईलमे, हितेश बिसने, अल्ताफ मालाधरी सह इतर युवक उपस्थित होते.

शाळांवर कुणाचेही नियंत्रण नाही!
“दूषित पाण्यामुळे होणारे आजार लक्षात घेता, नियमित पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याचे क्लोरीनेशन करणे गरजेचे आहे. परंतु, असे होत नाही. मुळात पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना कसे मिळते, यावर कुणाचेही नियंत्रण नाही. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा आहे. परंतु, पिण्याच्या पाण्यासंदर्भात कुणीही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.”
-अमित एच. मेश्राम, संयोजक : तरुण बेरोजगार कृती समिती, भंडारा जिल्हा.

आपली प्रतिक्रिया द्या