शाळांच्या ऑनलाईन नोंदणीला मुहूर्त सापडला, केंद्राची ‘यू-डायस प्लस’ नवी प्रणाली कार्यरत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

देशभरातील शाळांच्या ऑनलाइन नोंदणीला अखेर मुहूर्त सापडला असून udiseplus.gov.in या वेबसाईटवर शैक्षणिक वर्ष 2018-19 पासूनची शाळांची ऑनलाइन नोंदणी जूनमध्ये होणार आहे. ‘यूडायस प्लस’ हे यूडायसचे चालू व्हर्जन असून या माध्यमातून कमीत कमी वेळेत देशभरातील शाळांची माहिती गोळा केली जाणार आहे. नुकतेच या ऑनलाइन प्रणालीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांना ऑनलाइन यूडायसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

देशभरातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती यूडायसच्या माध्यमातून मिळविली जाते. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधा, शिक्षकसंख्या आदी माहिती दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत मिळविली जाते. पण यंदा ही माहिती ऑनलाइन भरावयाची असल्याने केंद्र सरकारने ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविली होती, पण या मुदतीतही ऑनलाइन माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले नाही. आता मार्चपासून शाळेची माहिती ऑनलाइन कशी गोळा करायची याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे.

जूनमध्ये नोंदणी
30 जूनपूर्वी देशातील सर्व शाळांची माहिती यूडायस प्लस या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदविण्यात येणार आहे. त्यापूर्वी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना 31 मार्चपर्यंत डाटा कॅप्चर फॉरमॅटचे (डीसीएफ) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत शाळेची माहिती भरायची असून ही माहिती भरल्यानंतर 31 मेपर्यंत ती तपासून सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.

कशी होणार ऑनलाइन नोंदणी

  • शाळांची माहिती डाटा कप्चर फॉरमॅटमध्ये (डीसीएफ) पीडीएफमध्ये वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे त्या शाळांना यूडायस सॉफ्टवेअर ऑनलाइन पुरविले जाणार आहे.
  • इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांमधील संगणकात सॉफ्टवेअर अपलोड केले जाईल.
  • डॅशबोर्ड, शाळांचे ऑनलाइन लोकेशन, थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन या सुविधा यूडायस प्लसमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
  • लॉगइनसाठी युजरनेम म्हणून शाळेचा यूडायस कोड वापरायचा असून पासवर्ड ब्लॉक एमआयएस कोऑर्डीनेटर पुरविणार आहेत.