
बागेत फिरायला गेलो की, विजेच्या, प्रकाशाच्या इशाऱयावर बदलणारी, वाहणारी कारंजी पाहतो. परंतु अनेक जुन्या वास्तुंमध्येही कारंजी असलेली वास्तुरचना तुम्ही पाहिली असतीलच. ताजमहाल, काश्मीरमधलं मुघल गार्डन तसंच दिल्लीतला लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंमध्ये अशी कारंजी पाहायला मिळतात. या वास्तु तर विजेचा शोध लागण्याआधी तयार झालेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेलच की, तेव्हा कारंज्यांची ही रचना कशी केली जात असावी? मुघल काळात कारंजे तयार करताना टेराकोटा पाईपचा वापर केला जात असे. त्या पाईपचा उतार इतका तीव्र असे की पाणी येऊन, वर जाऊन प्रचंड घुसळणीसह कारंज्याच्या छिद्रातून बाहेर पडत असे. पाण्याची गती नियंत्रित करणं, कारंज्यांची छिद्रं तयार करणं हे खरं कौशल्याचं काम आहे. तसेच ही कारंजी तयार करताना कलाकुसर होत असे. कारंज्यांची रचना अशी असे की पाणी एका ठिकाणी जमा केलं जात असे. त्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह छोटय़ा कालव्याद्वारे किंवा पन्हाळीद्वारे काढलं जात असे. पाण्याचा वेग आणि कारंज्यांचं आरेखन यामुळे त्या आरेखनातून ओसंडणारं पाणी सुंदरच वाटतं. मुघल वास्तूंमध्ये उभारण्यात आलेल्या कारंज्यांमध्ये गुरुत्वाकर्षण आणि हाइड्रॉलॉजिकल प्रणालीचा उपयोग केला जात असे.























































