ज्वालामुखीच्या गरम लाव्ह्यावर संशोधकांनी शिजवले हॉटडॉग…व्हिडीओ व्हायरल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईसलँडमध्ये सुमारे 6 हजार वर्षे शांत असलेल्या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. ज्वालामुखीचा हा उद्रेक बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांप्रमाणेच संशोधकही या परिसरात दाखल झाले आहेत. ते ज्वालामुखीच्या लाव्ह्यावर संशोधन करत आहेत. संशोधनादरम्यान त्यांना भूक लागली. या दुर्गम भागात पॅक फूड शिजवण्यासाठी संशोधकांनी नवा मार्ग शोधला. त्यांनी चक्क ज्वालामुखीतून निघालेल्या गरम लाव्ह्यावर हॉटडॉग आणि बन शिजवले. लाव्ह्यावर शिजवलेल्या या खाद्यपदार्थांचा आस्वाद त्यांनी सॉससोबत घेतला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

संशोधकांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संशोधकांनी हॉटडॉग शिजवण्यासाठी वापरलेल्या या पद्धतीची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. आइसलँडच्या माउंट फैगराडैल्सफाल भागात चार दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा पहिला उद्रेक झाला. त्यानंतर त्यातून सतत लाव्हारस निघत आहे. हा ज्वालामुखी रेकजाविक शहरापासून 35 किलोमीटरवर आहे. या ज्वालामुखीतून चार दिवसात 1 कोटी वर्गफूट लाव्हारस निघाला आहे. अनेकदा या लाव्हारसाने 300 फूटांवरही उसळी घेतल्याचे संशोधकांनी सांगितले.

आइसलँड युनिव्हर्सिटीचे जिओफिजिसिस्ट प्रोफेसर मॅग्नस तुमी गडमुंडस्सन यांनी सांगितले की आता या ज्वालामुखीचा सतत उद्रेक होण्याची शक्यता आहे. सुमारे 6 हजार वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या भागात असे उद्रेक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. 2010 नंतर आइसलँडमध्ये ज्वालामुखी उद्रेकाची मोठी घटना आहे.

आइसलँड हा भूकंपप्रवण देश असल्याने या ठिकाणी ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडत असल्याचे संशोधकांनी सांगितले. 2014 मध्ये या भागात मोठा भूकंप झाला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या आठवड्यात तब्बल 18 हजार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यातील काही धक्के 5 रिश्टर स्केलपुढील तीव्र स्वरुपाचे होते.

या भागात सातत्याने येणारे भूकंप, त्याचे वाढलेले प्रमाण, त्याची कारणे आणि ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारसाचे स्वरुप याचा अभ्यास करण्यासाठी संशोधक या भागात आले आहेत. त्यावेळी त्यांनी चक्क गरम लाव्ह्यावरच त्यांचे अन्न शिजवले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हे धोकादायक असल्याचे संशोधकांनी सांगितले. मात्र, हा संशोधनाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.