स्कॉटलंडच्या अष्टपैलू क्रिकेट खेळाडूचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्कॉटलंडचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू कोन दे लाँज यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोन दे लाँज हे दीर्घकाळापासून ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होते. स्कॉटलंड क्रिकेट संघटनेने अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

कोन दे लाँज यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला होता. परंतु क्रिकेट मात्र त्यांनी स्कॉटलंडकडून खेळले. कोन दे लाँज यांच्या नावावर एकूण 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांची नोंद आहे. 2015 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण केले होते. फिरकीपटू कोन दे लाँज याच्या 60 धावांतील 5 बळींच्या जोरावर स्कॉटलंडने न्यूझीलंडसारख्या प्रमुख संघाचा पहिल्यांदाच पराभव केला होता.

2018 मध्ये कोन दे लाँज यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. पैशांच्या कमतरतेमुळे त्याच्या कुटुंबीयांनी ब्रेन ट्यूमर चॅरेटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. परंतु उपचारादरम्यान कोन दे लाँजचे निधन झाले. क्रिकेट स्कॉटलंडचे अध्यक्ष टोनी ब्रायन यांनी कोन दे लाँजच्या निधनाप्रति दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या