सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत, प्रत्‍येक बोटीला मिळणार क्‍यू आर कोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सागरी सुरक्षेच्या मजबुती कारणासाठी शासनाने पावले उचलली असून ईगल आय हे नवे सॉफ्टवेअर कार्यन्वित केले आहे. ईगल आय सॉफ्टवेअरमध्ये बोटीसह बोटीवर असणारे खलाशी, तांडेल यांची इत्यंभूत माहिती या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाइन भरली जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्र किनारी बंदरातून खलाशी, तांडेल यांची माहिती संगणकामध्ये भरून साठवली जात आहे. माहिती पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक बोटीला क्यू आर कोड देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे संकटकालीन परिस्थितवेळी या यंत्रणेचा फायदा होण्यास मदत मिळणार आहे.

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या हद्दीत 122 किलोमीटरचा सागरी किनारा आहे. या ठिकाणी सागरी आठ तर खाडी 9 असे एकूण 17 पोलीस ठाणी आहेत. त्यात मांडवा सागरी, अलिबाग, वडखळ, श्रीवर्धन, दादरसागरी, मुरुड, दिघीसागरी, म्हसळा, रोहा, तळा, गोरेगाव, महाड तालुका, महाड शहर, पेण, पोयनाड व नागोठणे पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. देशविरोधी कारवायांसाठी दहशतवादी संघटनांनी सागरी मार्गाचा वापर केला आहे. 1993 च्या मुंबई साखळी बाँम्ब स्फोटासाठी आणि त्यानंतर 26 / 11 च्या हल्ल्यासाठी सागरी मार्गाचाच वापर करण्यात आला आहे. या कारणास्तव सागरी सुरक्षेला अनन्य साधारण महत्व दिले जात आहे. त्यात मुंबई लगतचा जिल्हा म्हणून रायगड जिल्हा महत्वाचा समजला जातो.

मार्च 1993 मध्‍ये मुंबईतील साखळी बॉम्‍बस्‍फोटांसाठी श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी या खाडीकिनाऱ्यावरून आरडीएक्सची तस्करी करण्यात आली होती. त्यानंतर 26 /11 ला मुंबईवर सागरीमार्गेच दहशतवादी हल्ला झाला. या सागरी हल्ल्यानंतर राज्यात सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक जिल्हयात स्वतंत्र सागरी सुरक्षा विभाग सुरु करण्यात आला. त्यानंतर सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाने आधुनिक पध्दतीचा अवलंब केला आहे. इगल आय सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये बोट, मालक, खलाशी, तांडेल यांची संपुर्ण माहिती संगणकाद्वारे घेऊन त्यांच्या कागदपत्रांचे स्कँन करून साँफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचे काम गेल्या आठ दिवसापासून सुरु करण्यात आले आहे. याबाबत पोलीसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक बंदरावर लॅपटॉप, स्कॅनर, वेब कॅमेरासह सायबरचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, दिघी सागरी, रेवदंडा, मांडवा सागरी, वडखळ, म्हसळा, श्रीवर्धन या पोलीस ठाण्यांमार्फत माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. रायगड जिल्ह्यात चार हजार 587 बोटी आहेत. आतापर्यंत दहा टक्के काम पुर्ण झाले आहे. बोटीसह खलाशी, तांडेल यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये घेऊन प्रत्येक बोटीला एक क्यू आर. कोड दिला जाणार आहे. या कोडद्वारे बोटीची सर्व माहिती पेट्रोलिंगच्या वेळी पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.