विशेष शाखेला ‘पॉलीसी’सह पॉलिसीची आवश्यकता; रटाळ कामकाजामुळे नागरिकांना मनस्ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारित्र्य पडताळणीच्या मनस्तापाला कंटाळून एकाने आयुक्तालयात पेटवून घेतल्यामुळे शहरातील पोलीस आयुक्तालयातंर्गत काम करणाऱ्या विशेष शाखेची (एसबी) अब्रु वेशीवर टांगली आहे. त्यामुळे संबंधित विभागाला पॉलिश करण्यासह पॉलिसीची आवश्यकता निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यातून पाठविलेल्या कागदपत्रांमध्ये चिरीमिरीसाठी मुद्दामहून घोळ घालणे, अर्जदाराला हेलपाटे मारण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीतील नागरिक पासपोर्टसह विविध कारणांसाठी चारित्र्य पडताळणी दाखल्याची मागणी करतात. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांकडून अर्ज विशेष शाखेकडे पाठविला जातो. त्यानुसार संबंधित अर्जदाराविरूद्ध गुन्हा दाखल आहे की नाही याची पडताळणी केली जाते. खात्री झाल्यानंतर अर्जदाराला चारित्र्य पडताळणीसह इतर दाखले दिले जातात. मात्र, नामसाधर्म्यामुळे सर्रासपणे नागरिकांना पोलीस ठाण्यांसह विशेष शाखेत हेलपाटे मारावे लागत आहे. त्याचाच फायदा घेत काही पोलीस ठाण्यांसह विशेष शाखेतील कर्मचारी एकमेकांना संपर्क करून नागरिकांची लूट करीत असल्याचेही प्रकार काही महिन्यांपूर्वी ‘दैनिक सामाना’ने उघडकीस आणले होते.

नोकरीसह पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी दाखल्याची आवश्यकता असते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन दाखला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बोटावर मोजण्याएवढ्याच नागरिकांना दाखले मिळत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे इतरांना लक्ष्मीदर्शनाशिवाय दाखले देण्यात येत नाही. काम होण्यासाठी अनेकांकडून पोलीस ठाण्यातंर्गत संबंधित विभागात काम करणाऱ्यांसह विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांना चिरीमिरी दिली जाते. यामध्ये पोलीस ठाण्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही हात ओले करावे लागत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. व्हेरिफिकेशनबाबत नागरिकांची तत्काळ कामे होत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे चारित्र्य पडताळणीसाठी पेटवून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर आता तरी विशेष शाखेत पारदर्शकता निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ओळखीशिवाय व्हेरिफिकेशनचे कामच होत नाही
चारित्र्य पडताळणीचे काम करण्यासाठी बहुतांश नागरिकांना पोलीस ठाण्यातील मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याशिवाय कामच होत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय नामसाधर्म्यामुळे अनेकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी प्राधान्याने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संगणक प्रणालीमध्ये बदल गरजेचा असल्याचे घटनांवरून दिसून आले आहे.