पुढील आठवड्यात ‘परे’वर दुसरी एसी लोकल येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local-train

सामना प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावर पुढील आठवडय़ात दुसरी एसी लोकल दाखल होणार असून या लोकलच्या तळाशी मोटार आणि संबंधित यंत्रणा बसविण्यात आल्याने या ट्रेनमध्ये अधिक प्रवाशांना सामावून घेता येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या पहिल्या वातानुकूलित लोकलला 25 डिसेंबर 2018 मध्ये एक वर्ष पूर्ण झाले. आता दुसऱ्या वातानुकूलित लोकलची रवानगी पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहे. ही लोकल आधीच्या एसी लोकलप्रमाणे ‘भेल’ कंपनीची नसून हैदराबाद येथील ‘मेधा’ कंपनीने तिची विद्युत यंत्रणा तयार केली आहे. या लोकलचे एसी आणि मोटार यंत्रणा लोकलच्या तळाला बसविण्यात आली असल्याने तिच्या डब्यात दहा टक्के अधिक प्रवासी सामावतील अशी आसनांची रचना आहे. पुढील आठवडय़ात ही ‘मेधा’ लोकल दाखल होणार असून तिच्या ट्रायल झाल्यावर ती प्रत्यक्षात सेवेत येईल, अशी माहिती चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याचे मुख्य यांत्रिक अभियंते सुभ्रांशू यांनी सांगितले.

14 मिक्स एसी लोकल?
‘मेधा’ कंपनीच्या सात लोकल पाठोपाठ मुंबईत दाखल होणार असून त्यापासून सहा-सहा डबे स्वतंत्र करून एकूण 14 मिक्स लोकल तयार करण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारत हेवी इलेक्ट्रिकल अर्थात ‘भेल’ कंपनीच्या 12 एसी लोकल एकापाठोपाठ मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.