
सामना प्रतिनिधी । लातूर
जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून आगामी चार दिवसात पेरणी होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी लातूर शहरात झालेल्या जोरदार पावसाने शहरातील गटारींचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. महानगर पालिकेच्या पावसाळापूर्व नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत होते. मागील 24 तासात जिल्ह्यात 13.10 मि.मी. सरासरी पाऊस झाला असून उदगीरमध्ये अतिवृष्टी झाली. तेथे तब्बल 80 मि.मी. पाऊस नोंदवण्यात आला.
लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून बळीराजाचे आगमन झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. आता चार पाच दिवसात पेरणी होणार आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 13.10 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. लातूर तालूक्य़ात 3.3 मि.मी., औसा तालूक्यात 6.14 मि.मी., रेणापूर तालूक्यात 2.25 मि.मी., उदगीर तालूक्यात 29 मि.मी., अहमदपूर तालूक्यात 2 मि.मी., चाकूर तालूक्यात 5.40 मि.मी., जळकोट तालूक्यात 4 मि.मी., निलंगा तालूक्यात 23.75 मि.मी., देवणी तालूक्यात 14 मि.मी., शिरुर अनंतपाळ तालूक्यात सर्वाधिक 41.33 मि.मी. पाऊस झाला. उदगीरमध्ये तब्बल 80 मि.मी. पाऊस झाला आहे. लातूर शहरात सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने शहर महानगर पालिकेची पावसाळापूर्व नालेसफाई कागदावरच असल्याचे दिसून आले. शहरातील महानगर पालिकेच्या पाठीमागील रस्त्यावरुन पाणी वाहात होते. गोलाई या बाजारपेठेतील गटारींचे पाणीही रस्त्यावरुन वाहात होते.






























































