नवी मुंबई प्रीमियर लीगची फटकेबाजी आजपासून

मुंबई प्रीमियर लीग पुन्हा सुरू होईल की नाही, याची कल्पना नाही. मात्र नवी मुंबई प्रीमियर लीगच्या दुसऱया पर्वाची फटकेबाजी उद्यापासून माझगाव क्रिकेट क्लबच्या कळंबोली येथील मैदानात सुरू होतेय. लीगच्या उद्घाटनीय सामन्यात गतविजेत्या मीराभाईंदर लायन्स संघासमोर कोपरखैरणे टायटन्स संघाचे आव्हान असेल. तर  प्रकाश झोतात  होणाऱया दिवसातील दुसऱया लढतीत उपविजेत्या ठाणे टायगर्स संघाचा सानपाडा स्कॉर्पिअन संघाशी सामना होईल.

उद्या 12 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱया या लीगमध्ये एकूण आठ संघ विजेतेपदासाठी झुंज देतील. त्यात अंबरनाथ अव्हेंजर्स, वाशी वॉरियर्स, कोपरखैरणे टायटन्स, मीरा-भाईंदर लायन्स, बेलापूर ब्लास्टर्स, ठाणे टायगर्स, सानपाडा स्कॉर्पिअन, कल्याण टस्कर आदी संघांचा समावेश असून स्पर्धेदरम्यान विजयी संघासह लीगमधील प्रत्येक संघाला रोख बक्षिसे देण्यात येतील, असे लीगचे  मुख्य प्रवर्तक शहाआलम शेख यांनी सांगितले. गतवर्षी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मीरा-भाईंदर संघाने ठाणे टायगर्स संघाला मत देत लीगचे विजेतेपद मिळवले होते. रोझ मर्कच्या सहकार्याने  होत असलेल्या दुसऱया वर्षींच्या लीगसाठी  सुमारे पाचशेहून अधिक  खेळाडू निवड चाचणीत सहभागी झाले होते. त्यातून तीनशे क्रिकेटपटूंना लिलाव प्रक्रियेकरता निवडण्यात आले. त्यानंतर लिलावाच्या माध्यमातून या खेळाडूंना लीगमधील आठ संघांनी आपल्या संघात सहभागी केले. त्यामुळे गेल्यावर्षीचा संघ कायम नसल्यामुळे यंदाही सामने चुरशीने खेळले जातील अशी आशा आयोजकांना आहे.

आयपीएलच्या धर्तीवर होत असलेल्या या लीगसाठी माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानाचा पूर्णतः कायापालट करण्यात आला आहे. संपूर्ण मैदानात हिरवळ तयार करण्यात आली असून संध्याकाळच्या सत्रातील सामन्यांसाठी विशेष प्रकाश योजना केली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अव्वल दर्जाच्या सामन्यात खेळणारे क्रिकेटपटू लीगमध्ये खेळणार आहेत. त्यांच्यासोबत खेळणाऱया स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.