
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या निदर्शनास आणून देत हे प्रश्न आठ दिवसात सोडविण्याच्या केलेल्या सूचनेप्रमाणे अशोक कडूस यांनी त्वरित माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची कार्यवाही केली. त्याबद्द्दल शिक्षक संघटनेने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. यावेळी कमलेश गोसावी यांनी आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले असून भविष्यात त्याच्याच नेतृत्वाखाली शिक्षकांचे प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षक प्रतिनिधींची माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर यांचे प्रलंबित प्रश्न कडूस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच हे सर्व प्रश्न आठ दिवसात सोडविण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी अशोक कडूस यांना दिल्या होत्या.
याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवारी कमलेश गोसावी संजय माळी, विवेक कळसुलकर, प्रशांत गोसावी, रमेश लहारे आदी शिक्षक प्रतिनिधीनी कडूस यांची भेट घेतली. यावेळी २ मे २०१२ नंतरच्या नियुक्त शिक्षकांच्या वैयक्तीक मान्यतेसाठी सुनावण्या व कॅम्पचे आयोजन करणे, २४ जाने २०१७ च्या शासन निर्णयाची अमंलबजावणी बाबत कार्यवाही अशा धोरणात्मक कामांबरोबर वैयक्तीक प्रस्तावांबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून सकारात्मक व गतिशील कार्यपद्धती राबविण्यात आली असल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.































































