सुरक्षा दरवाजांशी छेडछाड केल्याने मेट्रो विस्कळीत, अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो लाइन 7 वर एका प्रवाशाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या अॅटोमेटिक स्क्रीन डोअरला जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक काही काळ बाधित झाली. सीसीटीव्ही कॅमेऱयांची तपासणी केली असताना ही बाब उघडकीस आली. मेट्रो प्रशासनाने असे गंभीर कृत्य तुम्हाला शिक्षा होण्यास कारणीभूत ठरू शकत असल्यामुळे मेट्रोचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

दहिसर पूर्व या स्टेशनवर 7 ऑगस्ट रोजी सायं. 6.24 वाजता एका प्रवाशाने प्लॅटफॉर्मवर असलेले (अॅटोमेटिक स्क्रीन डोअर) दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे मेट्रो आणि प्रवाशांची सुरक्षितता रखण्यासाठी कार्यान्वित असलेली सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली. ही यंत्रणा जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा त्या स्टेशनवर ट्रेन येऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम दोन्ही मार्ग म्हणजे अप आणि डाऊन मार्गावर झाला.

सुरक्षा प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर सायं. 6.24 वा. दरवाजा (अॅटोमेटिक स्क्रीन डोअर ) क्रमांक 14 जवळ बिघाड झाल्याचे लक्षात आले. लगेचच यंत्रणा सुरळीत करण्यात आली, परंतु सीसीटीव्हीचे फुटेज बघून नेमके काय कारण आहे हे शोधण्यात आले. या अशा प्रकारांमुळे ट्रेन चालवण्यात अडथळा निर्माण होऊन सर्वांना विनाकारण त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱया व्यक्तीला मेट्रो रेल्वे अॅक्ट 2002 (ऑपरेशन अॅण्ड मेण्टेनन्स ) अंतर्गत पाच हजार रुपये दंड, किंवा एक वर्ष कैद किंवा दोन्ही अशा प्रकारे कारवाई होऊ शकते, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.