
‘मी बाळूमामाचा अवतार असून कर्करोग बरा करतो’, असे सांगून बारामतीतील तरुणाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले याला पुणे ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी साताऱ्यातील सालपे गावातून अटक केली. मनोहर भोसले विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओमकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादू टोणा उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. शशिकांत सुभाष खरात यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
शशिकांत खरात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसलेने बाळूमामा चा अवतार असल्याचे सांगितले यानंतर शशिकांतला त्यांच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो असे सांगत सुभाष यांना बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. तसेच विशाल वाघमारे शिंदे यांच्याशी संगनमत करत शशिकांतसह त्याचे वडील सुभाष यांना जीविताची भीती घातली. त्यानंतर 2 लाख 51 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकीही दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गुरुवारी मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची फिर्याद देखील दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या पुढील अडचणी वाढल्या होत्या































































