
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून आता उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा. सूत्रांनी पुढे सांगितले की, कूपर रुग्णालयाच्या सुरुवातीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. परंतु असे समजते की, शेफाली बऱ्याच काळापासून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेत होती.
पोलिसांनी आतापर्यंत शेफालीचा पती पराग त्यागी, पालकांसह 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सर्वांनी हे स्पष्ट केले आहे की, शेफाली बऱ्याच काळापासून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही औषधे घेत होती. पोलिसांनी शेफालीच्या घरातील फ्रीज तसेच टेबल ड्रॉवरमधून अनेक औषधे जप्त केली आहेत. यामध्ये ग्लूटाथिओन कॅप्सूल, पॅन डीएसआर, स्किन व्हाइटनिंग कॅप्सूल, हाय-डोस अँटी-एजिंग इंजेक्शन आणि इतर औषधे समाविष्ट आहेत. असा दावा केला जात आहे की, शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यापैकी काही औषधे घेत होती.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, शेफालीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या जबाबात दावा केला आहे की, 27 जून रोजी सत्यनारायण पूजा झाल्यानंतर, शेफालीने फ्रिजमधील उरलेला फ्राइड राइस गरम करून खाल्ला. त्यानंतर अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेतली. आतापर्यंतच्या तपासात कोणताही कट किंवा गुन्हेगारी दृष्टिकोन समोर आला नसला तरी, हे प्रकरण एका सेलिब्रिटीशी संबंधित असल्याने, मुंबई पोलिस अंतिम पोस्टमार्टम आणि व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहेत. शेफालीच्या मृत्यूमुळे स्व-औषध किती धोकादायक असू शकते याबद्दल एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.