आयुष्यात अनुभवलेली एक संवेदनशील आठवण सांगत आहेत ज्येष्ठ रंगकर्मी राजन पाटील…
मी ‘वात्रट मेले’ हे नाटक करत असतानाची एक आठवण आहे. 1987 हे ते वर्ष. त्या वेळी माझे वडील काविळीने आजारी असल्याने त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. नंतर कळले की, त्यांना ‘हिपॅटायटिस-बी’ ची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रोज रात्री मी तिथे वडिलांना सोबत म्हणून राहायला जात असे. दिवसा नाटकाचे प्रयोग आणि रात्री कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, असा माझा दिनक्रम असायचा. साधारण पंधरा ते वीस दिवस मी तिथे रात्रपाळी केली.
माझ्या वडिलांची तब्येत सुधारत होती. ते बरे होणार असे वाटत असतानाच एक दिवस त्यांना रक्ताची उलटी झाली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याच रात्री त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. डॉक्टर त्यांना
ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, पण काही वेळातच कळले की, ती प्रोसेस सुरू असतानाच बाबा गेले. हॉस्पिटलमध्ये मी एकटाच होतो. टाहो पह्डून रडावे असे वाटत होते, पण मी प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरले. घरी आल्यावर आईने विचारले, ‘‘कसे आहेत हे?’’ मी काहीही न बोलता तिला जवळ घेतले, ती समजून गेली. घरात आकांत सुरू झाला. पह्नापह्नी सुरू झाली. थोडय़ाच वेळात माझे काका आले. आल्या आल्या त्यांनी मला विचारले, ‘‘राजन, काय करू या? आज रात्री की उद्या? आज रात्री करायचे म्हटले तरी आपल्या नातलगांना इथे पोहोचणे जिकिरीचे होईल. पहाट होईल किंवा सकाळसुद्धा, पण उद्या तुझे नाटकाचे दोन प्रयोग आहेत ना?’’ मी म्हणालो, ‘‘हो, ‘वात्रट मेले’चा सकाळी अकरा वाजता शिवाजी मंदिरला आणि रात्री वाशी गावला प्रयोग आहे, पण अभिनयाचा वारसा मी बाबांकडूनच घेतला आहे. त्यामुळे त्यांनाही वाटत असेल की, मी ते प्रयोग करावेत.’’
शेवटी तसेच ठरले. सकाळी नऊ वाजता मला शिवाजी मंदिरला सोडून बरोबरची मंडळी पुढे नायर हॉस्पिटलला गेली. मी शिवाजी मंदिरच्या रंगपटात शिरताच सहकलाकारांनी माझ्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी केली. मी म्हटले, ‘‘काल रात्री ते गेले.’’ सगळय़ांना धक्काच बसला. प्रयोग रद्द करायचे ठरत होते, पण मी ठासून सांगितले, ‘‘आजचे दोन्ही प्रयोग होणार. माझे वडील गेले आहेत हे तुम्ही विसरून जा. मीसुद्धा ते विसरण्याचा प्रयत्न करतोय.’’ नाटक सुरू झाले. पहिली पंधरा मिनिटे जरा कठीण गेली. जन्मदाता गेला आहे, हे स्वीकारणेच जिथे जड होते, तिथे त्याला विसरायचे? पण समोर बाबांचा चेहरा आला. माझे पार्थिव घरी ठेवून लोकरंजनासाठी माझा मुलगा अभिनयाचे रंग उधळणार आहे हे समाधान विलसत असलेला त्यांचा चेहरा! ते विनोदी नाटक नेहमीप्रमाणे तुफान रंगले.
प्रयोग संपल्यावर मी घरी आलो. सगळे माझीच वाट बघत होते. मी वडिलांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांचा चेहरा डोळय़ांत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. छातीतले रुदन, आव्रंदन छाती पह्डून बाहेर येणार असे वाटू लागले, पण मी पुन्हा माझा ताबा घेतला. डोळय़ांतले अश्रू थोपवले. आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडल्यावर मी घरी आलो. आंघोळ केली आणि कपडे बदलून वाशीच्या प्रयोगासाठी निघालो. दारात आई उभी होती. ती मला बिलगून रडू लागली. मी तिला म्हणालो, ‘‘रडू नकोस. अजून एक प्रयोग बाकी आहे. माझी हिंमत तोडू नकोस.’’ मोठय़ा निर्धाराने मी बाहेर पडलो. नाटकाची बस दादरहून वाशी गावातल्या प्रयोगासाठी सुटणार होती. माझा वाशीचा प्रयोगही दणक्यात झाला. प्रयोग संपला. पडदा पडला आणि मग मात्र मी फुटलो. गेल्या 24 तासांत घेतलेले उसने अवसान गळून पडले. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. सगळे सहकलावंत मला समजावत होते. मी न जेवता झोपलो, अगदी गाढ झोपलो. पहाटे घरी आलो तेव्हा प्रकर्षाने जाणीव झाली की, घराचा आधार गेला आहे आणि आता मला तो आधार व्हायचा आहे…!
शब्दांकन – राज चिंचणकर