मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे ! साहित्यिक डॉ. नंदा मेश्राम यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगण्यासाठी भूक लागते आणि जगायला शिकवते ती खरी मराठी भाषा. प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असली तरी आज जेवढे तोकडे कपडे तेवढी मॉडर्न भाषा असे भाषेचे प्रमाण ठरू पाहतेय. अशावेळी खरी मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदा मेश्राम यांनी केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने आणि सार्वजनिक ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने परळ येथील मनोहर फाळके सभागृहात मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते. डॉ. नंदा मेश्राम यांनी आपल्या भाषणात भा. रा. तांबे, केशवसुत, विंदा करंदीकर, बहिणाबाई आदी ज्येष्ठ साहित्यिकांची कवितेची भाषा काळजाला भिडणारी होती असे सांगून पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील भाषेतून नात्यांचा पीळ विणला जातो तो विसरून चालणार नाही. प्राचीन काळापासून आलेली मराठी भाषा शिवरायांनी परकीय आक्रमणात वाचविली आणि संत परंपरेने तिला नवा आयाम प्राप्त करून दिला. शतकोन्शतकाचा हा वारसा लाभलेली मराठी भाषा कदापि मरणार नाही, मात्र तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने पुढे आले पाहिजे. यावेळी प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी, लेखक काशीनाथ माटल, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सेव्रेटरी शिवाजी काळे आदी उपस्थित होते.