सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्ष अपर्णा मोहिले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचे बुधवारी वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन नातवंडे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

कला शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या मोहिले 1965 बॅचच्या प्रशासन अधिकारी होत्या. त्यांची पहिली निवड डाक सेवेत झाली. टपाल खात्यात त्यांनी चीफ पोस्टमास्तर जनरल, पोस्टल सर्व्हिस डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड मेंबर अशा महत्त्वाच्या पदांवर काम करून वेगळा ठसा उमटवला. चित्रपट परीक्षण बोर्डाच्या सल्लागार समितीवर त्यांची 1978 मध्ये नियुक्ती झाली. त्या 1982-83 मध्ये कार्यकारी अध्यक्षा होत्या.

चित्रपट व साहित्य क्षेत्रातील विजया मेहता, वंदना विटणकर, शांता शेळके यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 1997-98 मध्ये त्या महाराष्ट्र व गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. मोहिले यांची ‘संसार आणि सेन्सॉर’, ‘त्रिदल’, ‘शब्दपुष्पांजली’ आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी’ ही पुस्तके प्रकाशित आहेत.