सेरेनाची फ्रेंच ओपन स्पर्धेमधून माघार, दुखापतीमुळे घेतला निर्णय

सेरेना विल्यम्स हिचे मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याचे मिशन पुन्हा एकदा अधुरेच राहिले. अमेरिकेच्या या महान टेनिसपटूने दुखापतीमुळे पॅरिस येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅममधून माघार घेतली. त्यामुळे बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवा हिला पुढे चाल देण्यात आली. सेरेना विल्यम्स व स्वेताना पिरोनकोवा यांच्यामध्ये दुसऱया फेरीची लढत होणार होती.

2017 सालापासून ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदापासून दूर

सेरेना विल्यम्स हिने 2017 साली ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जिंकले होते. त्यानंतर दोन वर्षे व आठ महिन्यांच्या कालावधीत तिला एकही ग्रॅण्डस्लॅम जिंकता आलेले नाही. प्रेग्नन्सी, दुखापत यामुळे ती सातत्याने टेनिस कोर्टपासून दूर होती. यंदा अमेरिकन ओपन स्पर्धेत तिचे आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आले. तसेच फ्रेंच ओपन स्पर्धेतील दुसऱया फेरीआधी सराव करताना तिला दुखापत जाणवू लागली. अखेर तिने माघार घेण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकन ओपनची उपविजेती अझारेन्का पराभूत

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत उपविजेती ठरलेली व्हिक्टोरिया अझारेन्का हिला फ्रेंच ओपन स्पर्धेत दुसऱया फेरीतच गारद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. अॅना पॅरोलिना श्मिदोवा हिने व्हिक्टोरिया अझारेन्काला 6-2, 6-2 असे सरळ दोन सेटमध्ये हरवले आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या