कोठारी शिवारात नोकराचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट

किनवट शहरापासून जवळ असलेल्या किनवट-नांदेड रोडवरील कोठारी शिवारात शेतातील गोठ्यावर नोकर असलेल्या धोंडीबा ज्योतीराम पिलवन रा. कोठारी (६५) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून रविवारी किनवट पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

किनवट-नांदेड रोडवरील बळीराम पाटील महाविद्यालयाजवळ असलेल्या शेतात एका गोठ्यावर धोंडीता ज्योतीराम पिलवन हा नोकर होता. सतीश खांडरे यांचे हे शेत असून, त्याच ठिकाणी दुसरा नोकर दिगांबर रामराव नरवाडे रा.कोठारी हा देखील काम करीत असतो. नरवाडे याने याबाबत पोलिसात खबर दिली. नरवाडे यांच्या म्हणण्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी इसम व एक ४५ वर्षीय महिला आठ दिवसापासून या गोठ्यावर राहते होते. २४ नोव्हेंबर रोजी ते दोघे व दुसरे दोन अनोळखी इसम सायंकाळी चार वाजता गोठ्यावर आले. सायंकाळी सहा वाजता चंद्रभागा धोंडीबा पिलवन व त्यांची पुतणी छाया गोविंदराव पिटलेवाड यांनी वेचलेला कापूस शेतातून सतीश खांडरे यांच्या घरी टाकून आपण घरी परतलो. धोंडीबा पिवलन हा रात्रंदिवस गोठ्यावर राहत असे. आज सकाळी आपण गोठ्यावर गेलो त्याठिकाणी धोंडीबा नव्हते. काही अंतरावर धोंडीबा यांचा मृतदेह तेथे आढळला. आपण लगेच मालकाला फोन करुन सदरची घटना सांगितली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. दिगांबर रामराव नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन चार अज्ञात मारेकऱ्याविरुध्द किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कांबळे या घटनेचा तपास करीत आहेत.