
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणीत सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना ऑनलाईन पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पीक विमा भरुन घेणारी वेबसाईटच ओपन होत नाहीये. त्यातच विमा भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्राप्रमुख विशाल कदम, डॉ. संजय कच्छवे यांनी केली आहे.
पीक विमा भरण्यासाठी १५ जुलैपासून सुरूवात झाली. विमा भरण्याची मुदत २४ जुलैपर्यंत असल्याने येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत, महा ई सेवा केंद्र व खाजगी सायबर कॅफेवर पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. पण ज्या वेबसाईटवर विम्याचा अर्ज भरला जात आहे त्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ती साईट ओपन होत नाही. परिणामी पीक विमा भरला जात नाही.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरिप हंगाम २०१८-१९ मधील पिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी २४ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तांत्रिक बिघाड व वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेवटचा एक दिवस शिल्लक असताना देखील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडून अर्ज सादर करण्यात आले आहेत. तर उर्वरित शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड, पासबुक, पिकांचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्र तयार करून विम्याची रक्कम व कागदपत्रे हातात घेऊन फिरताना दिसतात. त्यामुळे अशा वंचित शेतकऱ्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून तालुका स्तरावर विमा कंपनीचे कार्यालय स्थापन करावे अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.



























































