अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा सट्टेबाज अनिल जयसिंघानी याला विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे.

मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली होती. तो मागील सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या इशाऱ्यावरून मुलगी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून 10 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिक्षालाही अटक केली होती. एका प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी फॅशन डिझायनर असलेल्या अनिक्षा जयसिंघानिया हिने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाच गळ घातली होती. या कामासाठी अनिक्षाने एक कोटीची ऑफरदेखील दिली होती. मात्र अमृता यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी अनिक्षाला ताब्यात घेतले होते.

जयसिंघानी हा सट्टेबाज असून त्याने आणि त्याच्या मुलीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. गुजरात पोलिसांनी 2015 साली सट्टेबाजांविरोधात एका गुन्हा दाखल केला होता.