
संसदेच्या कामकाजावेळी सभागृहात फलकबाजी आणि घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. गुरुवारी दिल्ली हिंसाचारावरून विरोधी पक्षाने संसदेच्या दोन्ही सदनामध्ये गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी सभागृहाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
या काँग्रेस खासदारांचे निलंबन
1. गौरव गोगोई
2. टी.एन. प्रतापन
3. डीन कुरियाकोसे
4. आर. उन्नीथन
5. मणिकेम टागौर
6. बेन्नी बेहनान
7. गुरजीत सिंग ओजला
काँग्रेसच्या या सर्व खासदारांनी अर्थसंकल्पाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंद स्थगित करण्यात आले आहे.
#UPDATE Seven Congress MPs- Gaurav Gogoi, TN Prathapan, Dean Kuriakose, R Unnithan, Manickam Tagore, Benny Behnan and Gurjeet Singh Aujla have been suspended from Lok Sabha for the rest of the budget session on charges of gross misconduct https://t.co/XCAI1qpBuB
— ANI (@ANI) March 5, 2020
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली कानउघाडणी
वारंवार बजावूनही सभागृहात फलकबाजी आणि घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कठोर शब्दांत समज दिली. दिल्ली दंगलीवरील कारवाईच्या मागणीसाठी हमरातुमरीवर येण्याच्या आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या कृतीवर लोकसभाध्यक्ष प्रचंड संतापले. त्यांनी गोंधळी सदस्यांना फैलावर घेत बजावले की, समज देऊनही तुम्ही सभागृहाच्या मर्यादा ओलांडणार असाल तर मला तुम्हाला चालू अधिवेशन काळासाठी निलंबित करावे लागेल. मग तो विरोधी सदस्य असो अथवा सत्ताधारी पक्षाचा. आपला संताप व्यक्त केल्यानंतर गदारोळामुळे लोकसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.
फलकबाजी खपवून घेणार नाही – लोकसभाध्यक्ष
दिल्ली हिंसाचारावर संसदेत चर्चा व्हावी यासाठी काँग्रेस, बसपा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी लोकसभा व राज्यसभेत नोटिसा दिल्या होत्या. मात्र लोकसभेत लोकसभाध्यक्ष व राज्यसभेत सभापतींनी अशा चर्चेला संमती न दिल्याने विरोधक संतप्त झाले होते. दिल्लीतील परिस्थिती दंगलीनंतर आता पूर्वपदावर येतेय.परिस्थिती सुधारली की दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा होऊ शकेल, असे परखड मत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मांडले. मात्र तरीही विरोधी खासदार अमित शहा राजीनामा द्या, अशी मागणी करणारे फलक सभागृहात झळकावत होते. त्यामुळे लोकसभाध्यक्ष बिर्ला प्रचंड संतापले. त्यांनी मी बजावूनही तुम्ही असे फलक झळकावत असाल तर मला कारवाई करावी लागेल, असे बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना सुनावले.


























































