सात महिन्यांच्या बाळाची कोरोनाशी यशस्वी झुंज, टेराटोमा या दुर्मिळ टय़ुमरवरही केली मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेराटोमा या दुर्मिळ टय़ुमरने त्रस्त. त्यात कोरोनाची लागण झाल्याने अवघ्या सात महिन्यांच्या बाळाची प्रकृती बिघडली. उपचारासाठी परेलच्या वाडिया रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या या बाळाने कोरोनाशी यशस्वी झुंज दिली. त्यासोबतच डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे टय़ुमरवरही मात केली.

बिहारच्या भागलपूर जिह्यातील दांपत्याने 15 एप्रिलला या बाळाला उपचारासाठी वाडिया रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती या बाळाला ‘टेराटोमा’ नावाचा टय़ुमर असल्याचे आढळून आले. सर्वात प्रथम त्याची कोरोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बाळाला आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर बाळावार शस्त्रक्रिया करून 15 सेमी आकाराचा टय़ुमर छातीतून काढण्यात आल्याची माहिती बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी दिली. सात महिन्यांच्या बाळावर वेळेवर आणि यशस्वी उपचार करून बाळाला नवे आयुष्य दिल्याबद्दल रुग्णाच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या बाळाला असह्य वेदना होत होत्या आणि आम्ही प्रथम या बाळाला कोविडमुक्त करण्याचा निर्णय घेतला. कारण कोविड संक्रमणामुळे हे बाळ श्वास घेऊ शकत नव्हते. त्यानंतर टय़ुमर काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
– डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय