
आसाम रायफल्स आणि आसाम पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दिमासा नॅशनल लिब्रेशन आर्मीच्या (डीएनएलए) सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नागालॅण्डच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कारबी अंगलोग जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. आसामच्या कारबी अंगलोग जिह्यात डीएनएलएचे नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाल मिळाली होती. त्यानुसार जवानांनी सुरू केलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये सात नक्षली ठार झाले असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. जवानांनी त्यांच्याकडून चार एके-47 रायफल आणि मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त केल्याचे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश सोनोवाल यांनी स्पष्ट केले आहे. दिमासा नॅशनल लिब्रेशन आर्मी आदिवासींचा स्वतंत्र देश बनवण्यासाठी काम करत असून त्याचा प्रमुख नाईसोदाओ दिमासा तर सचिव खारमिनदाओ दिमासा आहे. डीएनएलएच्या नक्षलवाद्यांनी 19 मे रोजी येथील एका तरुणाची हत्या केली होती.

























































