अहमदपूर तालुक्यातील शेतकरी भूगर्भातील पाण्याच्या शोधात: पाणाड्यांची चांदी

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या सुरुवातीला वाढत्या उन्हामुळे शेत जमिनीत नारळाच्या सहाय्याने पाण्याचा शोध घेण्यात व्यस्त दिसून येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाण्यासाठी दाहीदशा फिरून झाल्याने दुष्काळाने व्याकूळ झालेला शेतकरी आता भूगर्भाची खोली धुंडाळतानाचे चित्र सध्या आहे. निदान जनावरांसाठी व पिण्यासाठी पाणी बोअरला लागेल या आशेने बोअर घेण्याची स्पर्धाच लागली आहे. ग्रामीण भागात एखादा पाणाडी गावात आला की, सर्व गाव त्या पाणाड्याकडून आपल्या शेतातील पाण्याची चाचपणी करत आहे तर गडगंज शेतकरी पाणी बघताच बोअरच्या गाडीची मागणी करत आहेत. त्यामुळे पाणी लागो न लागो पाणाड्याचा मात्र चांगलाच खिसा गरम होत आहे.

परराज्यातून अनेक बोअरवेल व्यवसायिक मराठवाड्यात दाखल झाल्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने भाव घेत आहेत. सहा इंची बोअरसाठी ८५ रुपये फुट प्रमाणे तर आठ इंची साठी ११० रुपये फुट प्रमाणे दर आकारला जात आहे. त्यामुळे सहा इंचीसाठी पाणी लागो अथवा न लागो ४० हजार ते ४५हजार रुपये मोजावे लागत आहेत. आठ इंचीसाठी ५०हजार ते ५५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एवढी महागाची खोदाई करून सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या नशिबाची परीक्षा पहावी लागत आहे. गेल्या तीन – चार वर्षात अल्प पर्जन्यमान असल्यामुळे जमिनीतच नाही ते येणार कुठून असा प्रश्न आहे. तरीही शेतकरी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून पाण्यासाठी झगडत आहे. त्याचा सगळेच गैरफायदा उठवत असून बोअरवेल व्यसायिक, पाणाडी, बोअर एजंट यांचे उखळ चांगलेच पांढरे होत आहे. मात्र यामुळे शेतकरी अधिकच कर्ज बाजारी होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील बहुतांशी जमीन हलकी, मुरमाड व खडकाळ प्रतीची असून या जमिनीला पाण्याची आवश्यकता जास्त भासते. परंतु यावर्षी उलटेच घडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून आता फळबाग व भाजीपाला तसेच एक-दोन वर्षात लागवड केलेली फळांची झाडे जगवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अहमदपूर तालुक्यातील शेतकरी भुगर्भातील पाणी शोधण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरत आहेत. त्यात नारळ, तांब्याचा तार, पोलादी पहार, पायाळू मनुष्य आदींच्या सहाय्याने जमिनीतील पाण्याचा शोध घेत असून जे लोक पाणी दाखवतात त्यांना एका पॉर्इंटसाठी दोन दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्या पॉईंटवर बोअरिंग मशीन मारले जात आहे. काहींच्या पदरी यश तर काहींना अपयशाचा सामना करावा लागत आहे.

ज्या शेतकऱ्याच्या बोअरला पाणी लागले त्या शेतकऱ्यांनी खुशीने बोअरमध्ये सबमर्सिबल पंप सोडून कमीत कमी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च केला मात्र ते पाणी कायमस्वरूपी टिकले नाही. दहा पंधरा दिवस सुरळीत चालल्यानंतर काही ठिकाणी पाणी गायब होणे, गुचक्या मारणे, कोरडी हवा येणे असे प्रकार घडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हा सर्व खटाटोप उन्हाळी पिके जोपासण्यासाठी शेतकरी करत असून त्याच्या पदरी निराशा पडत असल्याने भविष्यातील स्वप्नभंग पावत आहे.